मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी करत हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. सेवानिवृत्त न्यायाधीश एम. एल. ताहलियानी या प्रकरणाची चौकशी करणारअसल्याची माहिती मिळत आहे.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात निवदेन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीसह न्यायालयीन चौकशी होणार असे आश्वासन दिले होते. या संदर्भात सरकारकडून या संदर्भात आदेश न निघाल्याने विरोधक सातत्याने टीका करत होते. आता या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या न्यायालयीन चौकशी समितीचे मुख्यालय हे बीड येथे असणार आहे. सेवानिवृत्त न्यायाधीश एम. एल. ताहलियानी हत्या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. समितीला चौकशीसाठी कोणत्याही व्यक्तीला बोलावण्याचा, कागदपत्रे जप्त करण्याचा तसेच झडती घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. सहा महिन्याच्या आतमध्ये चौकशी समितीने हत्या प्रकरणावरील अहवाल राज्य सरकारकडे सादर करावा लागणार आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांकडून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींवर मकोका लावण्यात आला. याशिवाय खंडणी प्रकरणात अटक झालेल्या वाल्मीक कराडवरही मकोका लावण्यात आला आहे. न्यायालयाने कराडला सात दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर लगेच त्याला ७ दिवसांची एसआयटी कोठडी सुनावण्यात आली आहे.