पुणे : सजा फुरसुंगी (ता. हवेली) येथे फेरफार व सातबारा नोंद करण्याकरीता संबधीत तलाठ्यासाठी लाच मागणी करून लाच स्विकारणा-या खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ठकसेन ऊर्फ तुषार गलांडे(वय ४२ वर्ष, रा. नारायण नगर, फुरसुंगी गाव, ता हवेली, जि. पुणे)असे लाच स्वीकारणाऱ्याचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, यातील तक्रारदार यांना धनंजय रामचंद्र बेनकर (रा. धायरी गाव, पुणे) यांनी खरेदी केलेल्या गट नंबर ३०९, सर्व्हे नं. १३८ मिळकत संबंधातील फेरफार आणि सातबारा नोंदणीबाबतचे काम करण्याचे अधिकार शासकीय अधिकार पत्राद्वारे दिले आहेत. त्या अनुषंगाने बेनकर यांनी खरेदी केलेल्या जागेचा फेरफार धरुन सातबारा उता-यावर नोंद करण्यासाठी तक्रारदार पाठपुरावा करत होते. त्यानुसार तक्रारदार हे तलाठी कार्यालय, फुरसुंगी येथे गेले असता खाजगी इसम ठकसेन ऊर्फ तुषार गलांडे याने संबंधीत तलाठी चौधरी यांच्यासाठी तक्रारदार यांच्याकडे फेरफार नोंद व सातबारा नोंद करण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे दिली होती.
सदर तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, ठकसेन ऊर्फ तुषार गलांडे याने संबंधीत तलाठी आणि वरच्यांना देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे फेरफार नोंद व सातबारा नोंद करण्यासाठी १० हजार रुपये लाचेची मागणी करुन, तक्रारदार यांच्याकडून त्याचा पहिला हप्ता ५ हजार रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारली असता त्याना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले असून, खाजगी इसम ठकसेन ऊर्फ तुषार गलांडे यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ अ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्र, पुणे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल भोसले हे करत आहेत.