पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्य ढवळून निघालं आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराडच्या अनेक ठिकाणी मालमत्ता असल्याचे आता समोर येऊ लागले आहे. वाल्मिक कराडचे पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये उच्चभ्रू सोसायटीत वाल्मिक कराडचा फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर त्याच्या शरण येण्याआधी त्याच्या बँक खात्यावरतीही कारवाई केली गेली होती. त्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणाबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, वाल्मिक कराडचे किती अकाउंट सील केले आणि त्यात किती पैसे होते हे कळायला हवे. याप्रकरणात ईडी का लागत नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर आज कबड्डीचा बारामतीत कार्यक्रम आहे. तिथे शेतकऱ्यांनी वाल्मिक कराड विरोधात केलेल्या तक्रारीची माहिती घेणार आहे. हे सर्व गंभीर आहे. सरकारने यावर कारवाई करायला हवी, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
वाल्मिक कराडवर झालेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून कारवाई करावी. कराडचे कीती अकाउंट सील केले आणि त्यात किती पैसे होते हे समजायला हवे. या प्रकरणात ईडीची कारवाई का होत नाही, अनिल देशमुख आणि इतर नेत्यांवर ईडी लागली. मात्र, इथे गुन्हा नोंद असूनही ईडी का लावण्यात आली नाही? काल परळीत हिंसाचार झाला. टायर जाळली गेली, आंदोलनही झाले त्यावेळी पोलीस नेमकं काय करत होते? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
वाल्मिक कराडवर मकोका लावला याबाबत सरकारचे अभिनंदन. देर आये दुरुस्त आये. पण हा खंडणीचा प्रकार थांबायला हवा. असेच जर होत राहिले तर राज्यात गुंतवणूक कशी येणार? असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. संतोष देशमुख यांच्यासह परभणीतील घटनेतील दोघांना न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणामध्ये जे कोणी सहभागी असतील त्यांना फाशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील सुळेंनी सुप्रिया सुळे यावेळी केली आहे.
आईंना भेटले असतील तर हे खूप शॉकींग आहे..
धनंजय मुंडे जर जाऊन वाल्मिक कराडच्या आईंना भेटले असतील तर हे खूप शॉकींग आहे. त्यांचा नेमका अजेंडा काय आहे? राजीनामा नैतिकतेवर द्यायचा असतो.आजवर अनेक नेत्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला आहे. अनिल देशमुखांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता. वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा बीड जिल्ह्याचा प्रमुख आहे का हे पाहा असेही सुळे म्हणाल्या.
या प्रकरणात शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून म्हटलं की आपण वातावरण सुधारण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेऊ. सर्व पक्षाचे नेते राजकारण बाजुला ठेवून या प्रकरणात माणुसकीच्या बाजुला आहेत, यामध्ये कोणतंही राजकारण न आणता या दोन्ही कुटूंबाला न्याय देणं गरजेचं आहे, आणि राज्य कसं शांत होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहेत. शांततेच्या मार्गाने सर्व पार पडायला हवं, असंही त्यांनी सांगितलं.