मुंबई : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा शिवसेनेने दिला असून या पार्श्वभूमीवर येत्या २३ जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी अंधेरीत जाहीर सभा आयोजित केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सभेला मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्यानंतर शिवसेनेने (ठाकरे) आगामी महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेली २५ वर्षे मुंबई पालिकेवर एकहाती राज्य करणाऱ्या ठाकरेंनी मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय गांभीर्याने घेतली आहे. त्यादृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली असून मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, विधानसभेच्या पराभवानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकही बैठक न होता आघाडीबाबत समन्वय ठेवलेला नाही.
समन्वय ठेवण्याऐवजी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाला झालेल्या विलंबावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागले. अशातच आघाडीपासून दुरावलेल्या शिवसेनेने (ठाकरे) महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी कंबर कसली आहे. खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वीच नागपूर येथे पक्षवाढीला आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मुंबईपासून ते अगदी नागपूरपर्यंत शिवसेना महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे सांगत आघाडीतील मित्रपक्षांना धक्का दिला. त्यामुळे २३ जानेवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून अंधेरी येथे जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेची तयारी पक्षाचे नेते, माजी मंत्री अॅड. अनिल परब यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे यांची ही पहिलीच सभा होणार आहे.