मुंबई : वन्य प्राणी आपला अधिवास सोडून मानवी वस्तीत जाऊ नयेत, यासाठी उपाययोजना करण्यात येत असून ब्रिटिश कालखंडात केलेल्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. वन्य प्राणी हे भोजनासाठी मानवी वस्तीत प्रवेश करत असल्याने त्यांच्या अधिवासातच भोजनाची व्यवस्था होणे गरजेचे आहे. यामुळे वन्य प्राण्यांचे मनुष्यावर हल्ले होणार नाहीत, असे मत वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले. राज्यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या बिबट्यांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी नसबंदी करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार असल्याचेही नाईक यांनी सांगितले.
वाघ तसेच बिबट्यांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी वनमंत्री नाईक यांनी मंगळवारी मंत्रालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी मंत्री नाईक यांनी जंगलांच्या कोर क्षेत्रात विविध प्रकारची फळझाडे व रान भाज्या लावल्यास शाकाहारी प्राण्यांना त्या ठिकाणी खाद्य उपलब्ध होऊन मांसाहारी प्राण्यांची देखील अन्न साखळी तयार होऊन खाद्याची सोय होईल. त्यामुळे वन्य प्राणी मानवी वस्तीत अन्नाच्या शोधासाठी भटकणार नाहीत. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या मनुष्यहानीसंदर्भात आवश्यक त्या उपाययोजना करण्याबरोबरच योग्य ती नुकसानभरपाई देण्याचा शासन विचार करत आहे.
तथापि, बफर झोनमध्ये कोणत्याही व्यक्तीने जाऊ नये. वनसफारी करताना काही पर्यटक वन्य प्राण्यांच्या वाटा रोखून त्यांना पाहत असल्याचे दिसून आले. यावरही वन अधिकाऱ्यांना लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याचे नाईक म्हणाले. जंगलामध्ये लागणारी आग विझवण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. या विषयासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर कशा प्रकारच्या उपाययोजना राबवण्यात येत आहे, त्याचा अभ्यासही करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले. नागपूर येथील गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात २० डिसेंबर, तसेच २३ डिसेंबर २०२४ रोजी ३ वाघ व एका बिबट्याचा मृत्यू हा कोंबडीचे मांस खायला दिल्यामुळे झाला असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून आले.