शिक्रापूर (पुणे): कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथे निसर्ग उपचार केंद्र नावाने बनावट पदवी घेऊन हॉस्पिटल चालवणाऱ्या तोतया डॉक्टरवर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र कवठे येमाईचे वैद्यकीय अधिकारी सौरभ संजय ढमढेरे (वय २५, सध्या रा. कवठे येमाई, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी निसर्ग उपचार केंद्र चालवणारा डॉ. सजल कांती बिस्वास (रा. कान्हूर मेसाई, ता. शिरूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सजल कांती बिस्वास असे गुन्हा दाखल केलेल्या मुन्नाभाईचे नाव आहे. एक इसम बनावट पदवी घेऊन कोणतेही वैद्यकीय मान्यता प्राप्त प्रमाणपत्र नसताना जवळ औषधांचा साठा बाळगून नागरिकांवर वैद्यकीय उपचार करत असल्याची माहिती शिरुर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेश कट्टीमनी यांना मिळाली.
त्यांनतर प्राथमिक आरोग्य केंद्र कवठे येमाईचे वैद्यकीय अधिकारी सौरभ ढमढेरे, आरोग्य सेवक विनायक गोसावी आदींनी कान्हूर मेसाई येथील निसर्ग उपचार केंद्र येथे जात तेथील डॉक्टरकडे वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी केली. डॉक्टरने ग्रामीण निसर्ग उपचार औरंगाबादचे अनुभव प्रमाणपत्र दाखवले, दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तेथे तपासणी केली असता डॉक्टरजवळ वेगवेगळ्या औषधांचा साठा मिळून आला. मात्र, त्या औषधांच्या परवान्याबाबत विचारणा केली असता कोणताही परवाना मिळून आला नाही.