अकोला : अकोला जाळ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आल्यानंतर घराच्या नळाला पाणी आले. यामुळे महिलांची पाणी भरण्यासाठी धावपळ सुरु होती. याकरिता इलेक्ट्रिक पाण्याची मोटार लावली असताना पाणी भरत असताना मोटारीला स्पर्श झाला आणि घात झाला. मोटरमध्ये विद्युत प्रवाह उतरलेला असल्याने विजेचा जोरदार झटका बसून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना अकोला शहरात आज दुपारच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातल्या डाबकी रोडवरील भीम नगरातमध्ये ही घटना घडली असून संगीता शिरसाठ असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. दुपारच्या वेळी भीमनगरात महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात आला होता. यावेळी संगिता शिरसाठ यांनी नळावरील पाणी मोटर सुरु केली. संगीता यांचा घरात पाणी भरत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि त्यांचा तोल जात पाण्याच्या मोटरला स्पर्श झाला. त्यामुळे संगीता यांना जोरदार विजेचा झटका बसला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
पाणी भरण्यासाठी सुरु असलेल्या पाण्याच्या मोटारीवर संगीता या पडल्याने त्यांना विजेचा जोरदार झटका असून त्यांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणात डाबकी रोड पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आहे.