दिल्ली: पूजा खेडकर प्रकरण राज्यात चांगलंच चर्चेत आलं होतं. आता सर्वोच्च न्यायालयाने माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला तात्पुरता दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नागरी सेवा परीक्षेत ओबीसी प्रवर्ग आणि अपंगत्व कोट्याच्या अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेतल्यावरून माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या अटकेला १४ फेब्रुवारीपर्यंत स्थगित दिली आहे.
अधिक माहिती अशी की पूजा खेडकर प्रकरणात न्यायमूर्ती बी.व्ही.नागरथना आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने खेडकरच्या अटकपूर्व जामीनाबाबत दिल्ली सरकार आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली आहे. २०२३ च्या बॅचची आयएएस अधिकारी असलेल्या पूजा खेडकरवर चुकीच्या पद्धतीने आरक्षणाचा लाभ घेण्यात आल्याचा आरोप आहे. त्याच बरोबर २०२२ च्या यू पी एस सी परीक्षेत आपल्या अर्जात खोटी माहिती दिल्याचाही आरोप तिच्यावर आहे.
या प्रकरणात केंद्रीय लोकसेवा आयोगाने चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्यासाठी स्वत:ची बनावट ओळख तयार केल्याचे म्हटले आहे. बनावट दस्तावेज सादर केल्या मुळे पूजा खेडकर विरुद्ध फौजदारी कारवाई सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर विरुद्ध अनेक गुन्ह्यांमध्ये एफआयआर नोंदवला आहे. या बरोबरच केंद्र सरकारने पूजा खेडकरच्या निवड प्रक्रियेचा तपास करण्यासाठी एक सदस्य असलेली समिती स्थापन केली आहे. मात्र पूजा खेडकरणे तिच्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.