पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या ऑनलाइन प्रवेशाच्या अर्जनोंदणीला मंगळवार, १४ जानेवारीपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ९७१ पालकांनी अर्ज केले. अर्ज करण्याची अंतिम मुदत २७ जानेवारीपर्यंत आहे. आरटीई प्रवेशप्रक्रियेसाठी सर्वप्रथम राज्यभरातील शाळांकडून ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
प्रवेशासाठी अर्ज करताना प्राथमिक शिक्षण विभागाकडून काही सूचना केल्या आहेत. यामध्ये २५ टक्के प्रवेशप्रक्रियेसाठी १० शाळांची निवड करावी, आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे, पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करावयाचे आहे. परिपूर्ण अर्ज भरण्याची दक्षता घ्यावी, प्रवेशप्रक्रियेबाबत काही अडचणी असल्यास आरटीई पोर्टलवर मदत केंद्राची माहिती देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज भरताना माहिती अचूक असावी, ज्या पालकांनी यापूर्वी आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास या बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑफलाईन अपलोड करू नयेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.