मुंबई : दहावी, बारावी परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात, यासाठी शिक्षण विभागाने राज्यस्तरावर अभियान अत्यंत प्रभावीपणे राबवावे, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सर्व यंत्रणांना दिले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त परीक्षा देण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रेरित करावे, असे आदेश भुसे यांनी दिले.
मंत्रालयातील समिती सभागृहात शालेय शिक्षण विभागाचा भुसे यांनी आढावा घेतला. प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
केंद्र शासनाने जाहीर केलेले नवीन शैक्षणिक धोरण राज्यात राबवताना याची सर्व शाळांना पूर्वसूचना द्यावी. आवश्यक असणारे प्रशिक्षण संबंधितांना यावेळी दिले जावे. अभिनव प्रयोगांद्वारे, शालेय शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण करावे. शिक्षणाच्या गुणवत्ता, सुधारणा आणि धोरणांवर लक्ष केंद्रित करावे. शिक्षकांच्या कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी अधिक प्रशिक्षण कार्यक्रमांची अंमलबजावणी करावी. तसेच शालेय शिक्षण विभागाकडील योजना, उपक्रम कार्यक्रम मिशन मोडवर राबवावेत. १०० दिवसांचा कार्यक्रम, नवीन शैक्षणिक धोरण व आरटीआयची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, अशा सूचना भुसे यांनी दिल्या.