पिंपरी-चिंचवड : बीड मधील खंडणी प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराडने गुन्हेगारी मार्गाने कमावलेल्या पैशातून वेगवगेळ्या शहरांमध्ये कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप आमदार सुरेश धस आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. अशातच आता वाल्मिक कराडचं पिंपरी-चिंचवड कनेक्शन असल्याचं उघड झालं आहे. वाकडमधील पार्क स्टेट येथे कोट्यावधीचा फ्लॅट असल्याचं समोर आलं आहे.
वाल्मिक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावावर सहाव्या मजल्यावर ६०१ फ्लॅट नंबरचा हा फ्लॅट आहे. सुमारे एक लाख रुपयांचा मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी वाल्मिक कराडच्या फ्लॅटच्या दरवाज्यावर कर संकलन विभागाकडून नोटीस लावण्यात आली आहे. वाल्मिक कराडने थकबाकी न भरल्यास महानगरपालिका पुढे नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटाच्या सहभागात संशयित म्हणून वाल्मिक कराड याच्यावर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मकोका लागल्यानंतर परळीमध्ये मात्र, आंदोलन सुरू झाले असून कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली. बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराड समर्थकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले असून कराडची ७५ वर्षांची आई आणि पत्नीही या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.