भोर: भोर शहरातील श्रीपतीनगर येथे एकाच रात्री अज्ञात चोरटयांनी बंद असलेली ४ घरे फोडून १८ तोळे सोने, अडीच किलो चांदीसह २६ लाख ३५ हजाराची रोकड चोरुन चोरटे फरार झाले आहेत. या घटनेने शहरातील नागरिकांत घबराहट निर्माण झालेली आहे.
शहरातील पोलिस ठाण्यापासून १०० ते २०० मीटर अंतरावरील बंद असलेली चार घरे फोडून रविवार दि. १२ रात्री ते सोमवार दि.१३ पहाटेच्या वेळात या घरफोड्या झाल्या. चारही घरे बंद असल्यामुळे घरातील व्यक्ती सोमवारी दुपारी घरी आल्यावर चोरी झाल्याचे लक्षात आले. शहरातील श्रीपतीनगर येथील भारती दिपक मोरे, सविता विलास जेधे, माधव पुरोहित व ऋषिकेश वंजारी यांची बंद घरे अज्ञात चोरट्यांनी फोडली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भारती मोरे या रविवारी दुपारी कुटुंबासह बाहेरगावी लग्नसमारंभासाठी गेल्या होत्या. सोमवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास त्या घरी आल्या. त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या कुलपाचा कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील सर्व खोल्यांमधील कपाटांची आणि ड्रॉवरची उलथापालथ केली. दिवाणमधील सामानही काढून फेकून दिले. भारती मोरे यांनी दिवानाच्या आत कपड्यांमध्ये ६ लाखांची रोकड असलेली पर्स ठेवली होती. त्या पर्समधील पैसे चोरट्यांनी काढून नेले. मोरे त्यांनी मुलाच्या शिक्षणासाठी नातेवाईकांकडून पैसे जमा केले होते.
दुसरी चोरी पोलिस ठाण्यासमोर सविता जेधे यांच्या घरात झाली. त्या सोमवारी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमासाठी रविवारी सायंकाळी आपल्या मूळगावी गेल्या होत्या. सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्या घरी आल्यावर त्यांच्या घराच्या दरवाजाचा कोयंडा उचकटलेला आणि दरवाजा उघडा होता. त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिले तर घरातील सर्व सामान अस्थाव्यस्त केलेले दिसले. त्यांच्या कपाटातील लॉकर तोडून छोट्या पाकीटातील ६० हजारांची रोख रक्कम चोरून नेली. तिसरी चोरी माधव पुरोहित यांच्या घरी झाली .घरातील सर्वजण पुण्याला गेले, त्यावेळी चोरांनी दरवाज्याची कड़ी तोडुन घरात प्रवेश करुन घरातील १८ तोळे सोने आणि अडीच किलो चांदीसह ३ लाखांची रोकड चोरुन नेली. घरात लग्न समारंभ असल्याने सोने चांदी बनवुन ठेवले होते आणी रोकड आणली होती. दरम्यान भोर पोलिस ठाण्यात उशीरापर्यंत फिर्याद नोंदवण्याचे काम सुरु होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.