मुंबई: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. भारतीय नौदलातील जहाजे नौदलाल अर्पण करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी हे मुंबईत महायुतीचे आमदार आणि मंत्री यांच्याशी संवाद साधणार आहेत. या दरम्यान पंतप्रधान मोदींच्या मुंबई भेटीबद्दल तसेच आजच्या कार्यक्रमापासून धनंजय मुंडेना दूर का ठेवलं? या मुद्द्यावर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अधिक माहिती अशी की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले “मुंबई सगळ्यांचंच स्वागत करते, ते तर देशाचे पंतप्रधान आहेत. आमची धारावी लुटू देऊ नका अशी आम्ही मागणी केली आहे’. त्या संदर्भात पंतप्रधान काही बोलतात का हे पाहावं लागणार आहे. खरंतर बाकी मोदीजी मणिपूरला कधी भेट देतात? हा मोठा प्रश्न आहे. पंतप्रधान माणिपूरला लवकरच जातील अशी आमची अपेक्षा आहे. आगामी दिल्लीच्या निवडणुका झाल्या की त्यांना फार निवडणूक प्रचाराचं काम नसेल, मग त्यांनी मणिपूरला जावं”. असं संजय राऊत म्हणाले.
धनंजय मुंडेंबाबत राऊत काय म्हणाले?
पंतप्रधन नरेंद्र मोदी दौऱ्यावेळी महायुतीचे आमदार आणि मंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. यादरम्यान मंत्री धनंजय मुंडे हे परळीसाठी रवाना झाले आहेत. त्यांना या कार्यक्रमापासून दूर ठेवलं जातअसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. धनंजय मुंडे आज परळी दौऱ्यावर आहेत. याबद्दल काय सांगाल असं विचारलं असता धनजंय मुंडे यांना आजच्या कार्यक्रमापासून दूर ठेवलं की नाही याबद्दल आपल्याकडे अजून काही ठोस माहिती नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
आजच्या कार्यक्रमाला “अजित पवार, प्रफुल्ल पटेल असे अनेक नेते आहेत. या नेत्यांवर स्वत: पंतप्रधानांनी जाहीर सभेत आरोप केले होते. मग त्यांना पण दूर ठेवणार का? . अजित पवार यांच्यावर जे पंतप्रधान दोन दिवसांपूर्वी ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करतात, अशोक चव्हाण यांच्यावर आरोप करतात, ते आज मंचावर असणार आहेत. खरोखर तसं असेल तर मग धनंजय मुंडे यांच्यावर अन्याय कश्यासाठी आणि का?”, असेही राऊत म्हणाले.