हडपसर : हडपसरचे पोलीस कोयता गॅंग टोळीचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरत असल्याच्या कारणावरून मांजरी (बु) (ता. हवेली) परिसरातील नागरिकांनी हडपसर पोलीस ठाण्याच्या बाहेर जमून हडपसर पोलिसांचा निषेध नोंदवला आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व हडपसर पोलीस ठाणे यांना निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनानुसार, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता गॅंगची दहशत पसरलेली आहे. जो गावकरी यांना विरोध करेल त्यांच्या घरावर या गॅंगचे सदस्य दगडफेक करतात. त्यांच्या दहशतीमुळे तक्रार देण्यासही कोणी पुढे येत नाही. हडपसरचे पोलीस मात्र गॅंगवर अंकुश ठेवण्यास कमी पडत आहेत. यामुळे त्रस्त मांजरी येथील ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर नागरिकांनी निषेध नोंदवला आहे.
हडपसर शहर ज्या प्रकारे विकसित होत आहे त्याप्रकारे गुन्हेगारी वाढली असून सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे. मांजरी, काळेपडळ, गंगानगर या परिसरामध्ये छोट्या छोट्या गुन्हेगारी टोळ्या आहेत. या भागावर आपलेच वर्चस्व राहावे म्हणून, त्यांच्यामध्ये वाद होत असतात. तसेच हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता गॅंग पुन्हा एकदा सक्रिय झालेली आहे. मागील काही महिन्यांपासून या गॅंगचा त्रास मांजरी परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे.
रस्त्याने जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना अडवून त्याच्याकडे लुटमार करणे. महिलांना लूटने, हवेत कोयते फिरून परिसरात दहशत निर्माण करणे. यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले होते. त्यांनी वेळोवेळी पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दाखल केली. मात्र त्यांची दहशत कमी होण्याऐवजी वाढतच चालली. यांच्याविरुद्ध तक्रार देणाऱ्याच्या घरावर दगडफेक करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे त्रस्त मांजरी ग्रामस्थांनी आज हडपसर पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठ्या संख्येने जमून या कोयता गॅंग विरुद्ध निवेदन दिले
यापूर्वी हडपसर पोलीस ठाण्याचे रघुनाथ जाधव, सुनील तांबे, राजेंद्र मोहिते, हेमंत पाटील, प्रसाद लोणारे यासारख्या पोलीस अधिकाऱ्यांनी या कोयता गॅंगचे वर्चस्व मोडीत काढले होते. गुन्हेगार अल्पवयीन असले तरी त्यांच्या पाठीशी असणारे यांनाच पोलीसी खाक्या दाखवल्यामुळे, यासारख्या गॅंगचे वर्चस्व मोडीत निघाले होते. दुर्दैवाने आता असे होताना दिसत नाही.
दरम्यान, या गॅंगचे बहुतांश सदस्य हे अल्पवयीन आहेत असे पोलिसांकडून सांगण्यात येते. पोलिसांनी बघ्याची भूमिका न घेता, या गॅंग विरुद्ध कठोर कारवाई करावी. अन्यथा पोलीस आयुक्त कार्यालयावर हजारोंच्या संख्येने ग्रामस्थांच्या वतीने मोर्चा काढू. असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे