शिरूर : शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील महिलेला वडिलोपार्जित जमिनीच्या हक्कसोडपत्रानंतर मिळणार असलेले पैसे मागण्यासाठी पतीने छळ केल्याने एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी राहत्या घरात घडली आहे. छाया विजय विधाटे (वय ४०, रा. सणसवाडी, ता. शिरूर) आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत मयत महिलेची बहीण जया संजय गवळी (वय ३६, रा. घोडेगाव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी महिलेचा पती विजय भाऊसाहेब विधाटे (रा. सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणसवाडी येथील छाया विधाटे यांच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या जमिनीचे सर्व मुलींकडून हक्कसोडपत्र करून घेतले. तसेच मुलींना काही पैसे देणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर छाया यांचा पती विजय वारंवार पत्नीला वडिलांकडून हक्कसोडचे पैसे घेऊन येण्यासाठी तगादा लावत शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करून छळ करत होता. याबाबत छाया यांनी त्याच्या बहीण व भावाला सांगितले होते. त्यानंतरही विजयकडून छळ सुरू असल्याने छायाने गळफास घेऊन आत्महत्या केली.