बारामती : महिलेला रोजगार देतो असं सांगून तिला डांबून ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी नराधम आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा व माळेगाव पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. ही घटना बारामती तालुक्यातील पणदरे गावच्या हद्दीत एका हॉटेलच्या पाठीमागील पत्र्याच्या खोलीत घडली होती. पोपट धनसिंग खामगळ (वय २५. रा.. खामगळवाडी, ता. बारामती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पीडित महिला मूळची मध्यप्रदेशातील आहे. ती तळेगाव दाभाडे येथे पतीसह काम करत होती. कंपनीतील काम सुटल्याने तिचा पती गावी गेला होता. ती एकटीच असताना एका महिलेने तिची पोपट खामगळशी ओळख करून दिली. त्याचा हॉटेल व्यवसाय असून तेथे काम मिळेल असे तिला सांगितले. त्यानुसार खामगळने तिला पणदरे येथे २ जानेवारी रोजी बोलावून घेतले. तेथे ३ जानेवारी रोजी पत्र्याच्या खोलीत ही महिला झोपली असताना त्याने पहाटेच्या वेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
कोणाला काही सांगितल्यास खून करेल अशी धमकी दिली. मी तुझ्यावर पाळत ठेवण्यासाठी माणसे नेमली आहेत, पळून जायचा प्रयत्न केला तर नक्की खून करेन अशी धमकी त्याने तिला दिली. ११ जानेवारीपर्यंत तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. पोपट खामगळ याचेविरोधात यापूर्वी महिलेच्या विनयभंगाचा बारामती शहर पोलिस ठाण्यात, तर महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा माळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
एका जोडप्यातील महिलेला सुद्धा शरीरसंबंधासाठी तयार कर, असे त्याने या पीडितेला सांगितले. पीडितेने त्याला नकार दिल्याने त्याने तिला मारहाण करत पुन्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. जोडप्यातील एका महिलेच्या फोनवरून पीडितेने ही माहिती नातेवाईकांना दिली. नातेवाईकांनी पोलिसांना संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी पीडितेची सुटका केली. खामगळ याचेविरोधात लैंगिक अत्याचारसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.