मुंबई: आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) मुख्य प्रवक्तेपदी माजी खासदार आनंद परांजपे यांची निवड करण्यात आली आहे. परांजपे यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियुक्ती पत्र दिलं आहे.
येणाऱ्या 18,19 जानेवारीला शिर्डीमध्ये पक्षाचे शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी दिली आहे. अगोदर छत्रपती संभाजीनगरमध्ये हे शिबिर होणार होते. मात्र, शिबिरीचे ठिकाण बदलण्यात आल्याची माहिती तटकरे यांनी बोलताना दिली.
शिबिरामध्ये सभासद नोंदणी कार्यक्रम राबावला जाईल. जेणेकरून पक्ष विस्तारास मदत होईल. येणाऱ्या काळात राज्यभरात विविध जिल्ह्यातील शहरांमध्ये सभासद नोंदणी व्हावी यासाठी पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वच प्रमुख नेते त्या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचे तटकरे म्हणाले. आगामी काळात राज्यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्याच्या दृष्टिकोनातून तयारी केली जाणार असल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे.
आमचाच पक्ष खरा असल्याचे जनतेने दाखवून दिले आहे.
निवडणुकीबाबत निर्णय घेताना आम्ही सर्वजण एकत्र बसून निर्णय घेऊ. अमित शाहा वरिष्ठ नेते आहेत. या देशात वेगवेगळे निर्णय घेण्यामध्ये त्यांचं योगदान आहे. झालेल्या लोकसभेतनंतर विधानसभा निवडणुकीत आम्ही जनतेच्या न्यायालयात गेलो आणि आमचाच पक्ष खरा असल्याचे जनतेने दाखवून दिले आहे. शरद पवार मागच्या सहा दशकांपासून राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात सक्रियआहेत. मी पवार साहेबांच्या विषयी कुठलाही वक्तव्य करणं संयुक्तिक नाही. असेही तटकरे यावेळी म्हणाले.
छगन भुजबळ शिर्डीतील शिबिराला उपस्थित असतील?
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे शिर्डीतील शिबिरात सहभागी होणार आहेत का? असा प्रश्न तटकरे यांना विचारला असता तटकरे म्हणाले की, छगन भुजबळ यांनी उपस्थित रहावे असे आम्ही त्यांना सांगितलं आहे. ते उपस्थित राहणार आहेत आणि मार्गदर्शन करणार आहेत असेही तटकरे म्हणाले.