सिल्लोड: मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून विकासाची मोठ्या प्रमाणावर कामे केली. सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय दिला. काम करीत असताना कुठलाही भेदभाव केला नाही. मात्र, या निवडणुकीत जनतेने केलेल्या कामाची जाण न ठेवता जातीवादावर व धर्मावर येऊन मतदान केले. त्यामुळे विरोधी पक्षाच्या उमेदवाराला अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली. त्यामुळे यापुढे मी सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा आ. अब्दुल सत्तार यांनी येथे सोमवारी (दि. १३) अंभई येथे केली.
सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्राम सचिवालयाच्या इमारत बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी आ. अब्दुल सत्तार यांनी ही घोषणा करून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला. लोकांना विकास नकोय, प्रगती नको तर फक्त जातीयवाद पाहिजे म्हणून मी निर्णय घेऊन टाकला आहे. मी मतदारसंघात वैयक्तिक लाभांच्या योजनांचा लाभार्थ्यांना सर्वाधिक लाभ दिला. लाभार्थी कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, याकडे न बघता फक्त माणुसकीच्या नात्याने सुमारे २ लाख ४० हजार लाभार्थ्यांना वैयक्तिक योजनांचा लाभ दिला.
मात्र, लाभार्थ्यांनीही मतदान करताना लाभ देणाऱ्याकडे न बघता जात व धर्म वादाच्या नादी लागून मतदान केले. लोकांना विकास नको आहे. फक्त शेवटच्या चार दिवसांमध्ये झालेल्या प्रचारावर मतदान होत असेल, तर यापुढे विधानसभा निवडणूक लढणार नाही, असे आ. सत्तार यांनी स्पष्ट केले. सध्या जातीयवाद इतक्या टोकाला गेलाय की, लोक माणुसकी विसरत चालले आहेत, अशी उद्विग्नता व्यक्त करून मुलगा अब्दुल समीरची इच्छा असल्यास तो लढेल. मी मात्र विधानसभा निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली.
विकासकामे करून काय फायदा ?
याबाबत आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी वरील निर्णयास दुजोरा दिला. आपण १८-२० तास लोकांच्या सेवेत राहतो. त्यांची सुख दुःखे, अडीअडचणीत कायम धावून जातो. दोन्ही तालुक्यांचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सतत माझी धडपड सुरू असते. हजारो कोटी रुपयांची विकास कामे सुरू केली. काम घेऊन येणाऱ्यांची कधीही जात बधितली नाही, असे सर्व करूनही माझ्याकडे जातीच्या चष्यातून बघत असतील, तर विकास कामे करून काय फायदा? यापेक्षा निवडणुकीपासून दूर राहण्याचा मी निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.