पुणे : शहरातील जंगली महाराज रस्ता परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. परिसरातील रेव्हेन्यू काॅलनीमध्ये एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी अडीच लाखांचे दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेबाबत एका तरुणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सहकुटुंबीय शहरातील रेव्हेन्यू काॅलनी भागातील एका सोसायटीत वास्तव्यास आहेत. तक्रारदार हे मूळचे शिरुर तालुक्यातील आहेत. सोमवारी ते आपल्या मुळगावी गेले हाेते. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडले. आणि कपाटात ठेवलेल्या दोन सोन्याच्या बांगड्यांची चोरी केली. दुसऱ्या दिवशी सायंकाळी तक्रारदार गावाहून परतले असता त्यांना सदनिकेचे कुलूप तुटल्याचे दिसले. चोरट्यांनी कपाटात ठेवलेल्या पाच तोळ्यांच्या बांगड्या चोरुन नेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पाेलीस उपनिरीक्षक अजित बडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
कोंढवा भागात दुसरी घटना
दरम्यान, कोंढवा भागात एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील एक लाख त्र्यांनव हजार पाचशे रुपयांचे दागिने चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला कोंढव्यातील इनामनगर भागात राहतात. रविवारी सायंकाळी सहा वाजता त्या घर बंद करुन खरेदीसाठी बाहेर गेल्या होत्या. तेंव्हा चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले कपाट उचकले एक लाख त्र्यांनव हजार पाचशे रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. तासाभरानंतर महिला खरेदी करुन घरी परतली. तेंव्हा कुलूप तुटल्याचे दिसले. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.