मुंबई : राज्यात पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमण्यात येणार असून नाशिक येथील राम- काल पथ विकास, आणि सिंधुदुर्ग (मालवण) येथील समुद्रातील पर्यटन हे प्रकल्प वॉररूमशी जोडण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणारे पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे.
यासह राज्य लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत पर्यटन विभागाच्या १४ सेवा ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे आगामी शंभर दिवसात पर्यटन विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी घेतला.
पुरंदर शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क तातडीने उभारावा
मुख्यमंत्री म्हणाले की, शासनाकडून अनुदानित प्रकल्पामध्ये नाशिक येथील राम – काल पथ विकास, सिंधुदुर्गातील मालवण येथील पाण्याखालील सागरी पर्यटनाचा अनुभव, स्वदेश दर्शन अंतर्गत आंबेगाव पुणे येथे पुरंदर शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क उभारणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकास, अजंठा वेरूळ पर्यटन विकास ही कामे सुरू करून त्याला गती देण्यात येणार आहे.
स्वदेश दर्शन २.० अंतर्गत अहिल्यानगर येथे किल्ल्यावरील पर्यटन आकर्षणासाठी उपक्रम राबविण्या संदर्भातील कामे तातडीने पूर्ण करावी. राज्याच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत अमृत सांस्कृतिक वारसा पालघर येथील आदिवासी विकास पर्यटनाला चालना देणे, शिवसृष्टी थीम पार्क राज्यातील पाच ठिकाणी उभारणे, पंढरपूर येथे सभा मंडप स्कायवॉक या सर्व कामांसाठी सल्लागार नेमून ही कामे तात्काळ सुरू करण्यात यावीत असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
पर्यटन विभागाने ३१ मार्चपूर्वी उद्योग प्रमाणपत्र, कृषी पर्यटन युनिट नोंदणी प्रमाणपत्र ,साहसी पर्यटन युनिट नोंदणी प्रमाणपत्र, कॅराव्हॅन पर्यटन नोंदणी प्रमाणपत्र, आई महिला उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत नोंदणी, पर्यटन व्हिलाची नोंदणी, पर्यटन अपार्टमेंटची नोंदणी प्रमाणपत्र, होम स्टे नोंदणी प्रमाणपत्र, व्यावसायिक गृहाची पर्यटन नोंदणी प्रमाणपत्र या नवीन सेवा लवकरात लवकर सुरू कराव्यात असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
राज्यातील पर्यटन पोहचणार आंतरराष्ट्रीय पातळीवर
आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्यातील पर्यटन पोहोचवण्यासाठी विविध फेस्टिवल तसेच ‘रोड शो’ आयोजनाबाबत महाराष्ट्र शासन सहभागी होणार आहे. माद्रिद येथे होणारा फितुर आंतरराष्ट्रीय ट्रेड फेअर, नाशिक येथील ग्लंम्पिंग फेस्टिवल, दिल्ली येथे होणारा भारत पर्व, पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील हिंदवी स्वराज्य महोत्सव, बर्लिन येथे आयटीबी अंतर्गत, महाबळेश्वर येथे होणारे टुरिझम कॉन्क्लेवमध्ये पर्यटन विभाग सहभागी होणार आहे. याबाबत पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे यांनी सादरीकरण केले.