जळगाव : सुरत येथून प्रयागराज येथे जात असलेल्या ताप्तीगंगा एक्सप्रेस जळगाव रेल्वे स्थानकावर आऊटरला उभी असताना अज्ञात माथेफिरुने एक्सप्रेसवर दगडफेक केली. ही घटना रविवारी दुपारी सव्वा तीन वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर घडली. यामध्ये बी ६ या एसी बोगीच्या खिडकीची काच फुटली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नसून याप्रकरणी रेल्वे पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तरप्रदेशातील महाकुंभाला देशभरातून साधूसंत त्याठिकाणी जात आहे. सुरत येथून प्रयागराज येथे निघालेली ताप्तीगंगा एक्सप्रेस ही जळगाव रेल्वे स्थानकावर आली. रेल्वे स्टेशनावर आऊटरला उभ्या असलेल्या एक्सप्रेसच्या बी ६ क्रमांकाच्या बोगीमधील बर्थ क्रमांक ३३ ते ३९ जवळ असलेल्या काचेवर अज्ञात माथेफिरुने दगडफेक केली. यामध्ये एक्सप्रेसचे काच फुटून नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही.
एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र तो पर्यंत दगडफेक करणारा माथेफिरु तेथून पसार झाला होता. पोलिसांन सर्वत्र परिसरात संशयिताचा शोध घेतला, मात्र तो कुठीही मिळून आला नाही. ताप्तीगंगा एक्सेवर दगडफेक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबवत रेल्वे स्टेशन निरीक्षक मनोज सोनी यांनी घटनेची माहिती जाणून घेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल केला.