तुळजापूर : तालुक्यातील मंगरुळ येथे उपचारासाठी आलेल्या तरुणीस भुलीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. याप्रकरणात तरुणीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाल्यापासून संबंधित डॉक्टर फरार झाला होता. अखेर तब्बल ७० दिवसानंतर आरोपी डॉक्टर रमेश लबडे यास बेड्या ठोकण्यात तुळजापूर पोलिसांनी यश आले आहे. शनिवारी (दि.११) रात्री डॉ. लबडेस पुण्यातून अटक करण्यात आली असून रविवारी त्यास न्यायालयासमोर हजर केले असता त्यास पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील ओमसाई क्लिनिक येथील डॉ. रमेश राजेंद्र लबडे याच्याविरोधात उपचाराकरीता दवाखान्यात आलेल्या युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी १ नोव्हेंबर २०२४ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. परंतु, मागील तब्बल ७० दिवसापासून डॉक्टर पोलिसांना सापडत नसल्याने पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तसेच यामुळे संताप ही व्यक्त होत होता. दरम्यान, डॉक्टरचा एक चुलत भाऊ त्याच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्याचे लोकेशन ट्रॅप केले असता ते पुण्यात दिसुन आले. तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तात्याराव भालेराव, श्री. राऊत, गणेश माळी यांनी शनिवारी रात्री पुण्यात जाऊन त्यास जेरबंद करत रात्रीच तुळजापूर येथे आणले. तसेच रविवारी (दि.१२) डॉक्टर लबडेस तुळजापूर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.