पुणे : एमपीडीए गुन्ह्यात मागील महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला वारजे माळवाडी पोलिसांनी लोणावळ्यातून बेड्या ठोकल्या आहेत. अभिजित ऊर्फ चोख्या तुकाराम येळवंडे (वय २४, रा. कर्वेनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध विविध स्वरूपाचे गुन्हे वारजे माळवाडी पोलिस ठाण्यांतर्गत दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी आरोपी येळवंडे याच्याविरुद्ध एमपीडीएनुसार नाशिक कारागृहात स्थानबद्धतेच्या कारवाईचे आदेश दिले होते. आरोपी अभिजित येळवंडे याने जून २०२१ मध्ये रवींद्र तागुंदे याला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला होता. याप्रकरणी तीन सहआरोपी सामील होते. संबंधित गुन्ह्यात त्याला अटक करून मोक्का कारवाई केली होती. नोव्हेंबर २०२३ मध्ये आरोपी येळवंडे जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर त्याने पुन्हा वारजे माळवाडी परिसरात गुन्हा केला.
एमपीडीएनुसार कारवाई झाल्यानंतर ४ डिसेंबरपासून आरोपी पसार झाला होता. गुन्हे शाखेसह वारजे माळवाडी पोलिसांच्या नजरेत येऊ नये, यासाठी आरोपीने पुरेपुर खबरदारी घेतली होती. पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांना आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. उपनिरीक्षक संजय नरळे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक आरोपीच्या शोधार्थ रवाना करण्यात आले. माहितीनुसार आरोपी येळवंडे लोणावळ्यात असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने लोणावळ्यात दोन दिवस शोधमोहीम राबवून त्याला अटक केली.