पुणे : घरगुती गॅस सिलिंडरचा साठा करून त्याची अवैधरीत्या सुरू असलेली विक्री सिंहगड रोड पोलिसांच्या पथकाने उघडकीस आणली आहे. गॅसचा काळा बाजार करणाऱ्या एकाला बेड्या ठोकत त्याच्याकडून टेम्पोसह ६१ गॅसच्या टाक्या जप्त केल्या आहेत. विकास धोंडाप्पा आकळे (वय ३१, रा. चरवडवस्ती, वडगाव बुद्रुक, मूळ. रा. सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आकळे याच्यावर दोन महिन्यांपूर्वी अशाप्रकारे कारवाई केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीत गस्तीवर होते. त्यादरम्यान वडगाव बुद्रुक भागात एकाने अवैधरीत्या गॅसचा साठा केला असून, त्याची चोरून विक्री करत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी तेथे एक टेम्पो उभा असलेला दिसला.
पोलिसांनी त्याची पाहणी केली असता, त्यामध्ये गॅसच्या टाक्या आढळून आल्या. त्यानुसार पोलिसांनी विकास आकळे याला ताब्यात घेऊन त्याच्यावर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाईंगडे, गुन्हे निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, अंमलदार संजय शिंदे, आण्णा केकाण, उत्तम तारू यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.