सोलापूर: पोलिसांबद्दल समाजात बरंचसं वेडंवाकडं बोललं जात. परंतु, पोलीस आपल्या कर्तव्याला जागत समाजाची सेवा प्रामाणिकपणे करत असतात याचा प्रत्यय दहिटणेवासीय ग्रामस्थांना आला आणि गळफास घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तरुणीचा जीव वाचला. कौटुंबिक करणामुळे त्रासलेल्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला. तिने गळ्यात गळफास घातला आणि पोलीस दीदी अनिता मोरे यांना फोन करून पंधरा मिनिटात आला नाही, तर मी जिवाचे बरे वाईट करीन, असा धमकीवजा इशारा दिला.
जोडभावी पेठ पोलीस ठाणे ते दहिटणे गाव हे गाव जवळपास दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असेल. अनिता मोरे यांनी कर्तव्याला जागून आपल्या पथकासह त्या ठिकाणी तात्काळ पोहोचल्या.
दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद देत केलेल्या प्रयत्नांमुळे तरुणीचा प्राण वाचला. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. यातील अल्पवयीन मुलगी ही इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत आहे. तिच्या कुटुंबात सतत काही ना काही कारणाने कलह होतो. सततच्या होणाऱ्या कलहाला ती कंटाळली होती. यातून कायमची सुटका करून घेण्याचा मार्ग म्हणून तिने स्वतःच्या जिवाचे बरे वाईट करून घेण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे राहत्या घरातील खोलीत तिने स्वतःला बंद करून घेतले. खोलीतील पंख्याला पोरी बांधली पायाखाली खाली खुर्ची घेऊन दोरीचा फास गळ्यात अडकवला. परंतु, नियतीने तिच्या मनात विचार आणले आणि तिने शेवटची मदत म्हणून पोलीसदिदी अनिता मोरे यांना फोन केला. पंधरा मिनिटांत आला नाहीत, तर जिवाचे बरे वाईट करून घेईन, असा धमकीवजा इशारा तिने दिला.
जरी अंगावर खाकी असली तरी संवेदनशील माणूस म्हणून अंमलार मोरे यांनी तातडीने मुलीचे घर गाठले. समोरचे दृश्य पाहून त्यांनाही काही वेळ सुचेनासे झाले. पण, प्रसंगी समोरील व्यक्तीची मानसिकता लक्षात घेऊन त्यांना हाताळण्याची कला अवगत असलेल्या पोलीसदीदी अनिता मोरे यांनी तिला अवघ्या काही मिनिटांत विश्वास दिला, तिच्या मनातील नैराश्य दूर करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आणि ती मुलगी बंद खोलीचे दार उपाडून बाहेर आली. त्यामुळे अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला, तिला पोलीस ठाण्यात आणून तिचे समुपदेशन करून तिला पुन्हा नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास चाहाण, शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अनिता मोरे, सपना पवार व विठ्ठल पैकेकरी या पथकाने केली.