नाशिक : निफाड येथून देवदर्शन करून नाशिकला परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला शहरातील द्वारका परिसरात उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. या अपघातात आठजण ठार झाले असून, काहीजण जखमी झाले. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रविवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना भाविकांचे वाहन त्याच्यापुढे लोखंडी सळई घेऊन जात असलेल्या आयशरवर धडकल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत व जखमी हे शहरातील सिडको परिसरातील आहेत.
मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या आयशरला पाठीमागून धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. रात्री आठच्या सुमारास चारचाकी वाहन (क्र. एमएन १५ एफव्ही ५६०१) हे पिंपळगावकडून मुंबईच्या दिशेने उड्डाणपुलावरून जात होते. द्वारका परिसरात ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात या वाहनाने समोरील आयशर (क्र. एमएच २५ यू ०५०८) ला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे समोरील वाहनातील लोखंडी सळ्या ओव्हरटेक करणाऱ्या या वाहनात शिरल्याने पाच जणांचा मृत्यू झाला, तर सातजण गंभीर जखमी झाले.
आजूबाजूच्या वाहनचालकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना वाहनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तसेच बाहेर काढलेल्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याचवेळी द्वारका चौकात कर्तव्यावर असलेल्या भद्रकाली पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या भीषण अपघातामुळे पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. जखमींना उपचारासाठी दाखल केल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, या भीषण अपघातातील जखमींची विचारपूस करण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी कल्पतरू खाजगी रुग्णालयाला भेट दिली आहे. त्यानंतर अपघातात मृत्यू पावलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची शासकीय मदत देणार असल्याची घोषणा ही मंत्री गिरीश महाजन यांनी केली. तर बऱ्याच अपघतामध्ये नियमांचे पालन होत नाही. गाड्यांना टेललॅम्प, रेडियम या सारख्या अत्यावश्यक गोष्टी देखील नसतात. त्यामुळे या संदर्भात गंभीर दखल घेऊन कडक कारवाई करण्याची मागणीही मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.