पुणे : पुण्याच्या कोथरूड भागातुन धक्कादायक घटना समोर आली आहे. लष्करी अधिकारी असल्याचे सांगून सायबर चोरट्याने कोथरुड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची पाच लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी सायबर चोरट्याविरुद्ध कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी ज्येष्ठ व्यक्तीने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एका बंँक खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ नागरिक कोथरुडमधील गुरुगणेशनगर भागात एका सोसायटीमध्ये राहायला आहेत. डिसेंबर महिन्यात चाेरट्याने ज्येष्ठाच्या मोबाइल वर संपर्क साधला. चोरट्याने लष्करात अधिकारी असल्याची बढाई मारत म्हणाला कोथरूड भागात भाडेतत्त्वावर घर घ्यायचे आहे असे सांगितले. यासाठी तुम्हाला अनामत रक्कम पाठवितो असे सांगून ज्येष्ठाच्या बँक खात्याची माहिती घेतली.
बँक खात्याच्या माहितीचा गैरवापर करुन चोरट्याने ज्येष्ठाच्या खात्यातून पाच लाख ३५ हजार २०० रुपये पळवल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
कोथरूड मधील दुसऱ्या घटनेत सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून २९ लाख पळवले
याच भागातील,अजून एकाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून २९ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत एकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्याने तक्रारदाराच्या मोबाइलवर संदेश पाठविला, शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो, असे आमिष त्यांना दाखविले होते.
तक्रारदाराला सोशल मिडियावरील एका ग्रुप मध्ये सामील करुन घेतले होते. भरमसाठ परताव्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून अनेक वेळा पैसे उकळले. तक्रारदाराने चोरट्याच्या बँक खात्यात २९ लाख ४० हजार रुपये जमा केले. त्यानंतर चोरट्याने त्याचा मोबाइल नंबर बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम या प्रकारणाचा सखोल तपास करत आहेत.