पुणे: पुणे शहरातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या वेगवेगळ्या घटना दररोज समोर येत आहेत. आता चोरट्यांनी चक्क मेट्रोचे खांब चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्याच्या शिवाजीनगर भागामधील कामगार पुतळा परिसरातून मेट्रोचे तब्बल दोन लाख रुपयांचे लोखंडी खांब चोरीला गेले होते. आता या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. अनिकेत महेंद्र कांबळे, गणेश मच्छिंद्र कांबळे, तौसिफराज फैज अहमद शेख, शमशुद्दीन युसुफअली शेख मन्सुरी, मुस्तफा मुस्तकीम शेख आणि वसीम अयुब पठाण अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
याप्रकरणी काहीदिवसांपूर्वी, मेट्रोचे सुरक्षारक्षक चंद्रकांत शेलार यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही आणि इतर माहितीच्या आधारावर पोलिसांनी सहा जणांना अखेर बेड्या ठोकल्या आहेत. चोरट्यांनी कसून चौकशी केली जात आहे. ते आणखी इतर कोणत्या गुन्ह्यात सामील आहेत का? याचा शोध पोलीस लावत आहेत.
कामगार पुतळा परिसरातुन चोरी
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गाचे काम सध्या सुरू आहे. शिवाजीनगर न्यायालय परिसरातील कामगार पुतळा परिसरात मेट्रोचे साहित्य मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी शेख, मन्सुरी, कांबळे, पठाण या चौघांनी कामगार पुतळा परिसरात ठेवलेले दोन लाख रुपयांचे लोखंडी खांब चोरून ते भंगारात विकणार होते.
मेट्रोचे सुरक्षारक्षक चंद्रकांत शेलार यांनी चोरट्यांना लोखंडी खांब चोरुन नेण्याच्या तयारीत असल्याचे पहिले. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती मेट्रोचेअधिकारी, तसेच पोलिसांना दिली. या प्रकरणात सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे . पोलीस उपनिरीक्षक कविराज पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.