मुंबई : वासईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मकरसंक्रातीचा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. तिळगुळाचे लाडू आणि पतंग ही या सणाची खास वैशिष्ट्य मानली जातात. पंतग उडवण्याचा मोह लाहणग्यांपासून मोठ्यापर्यंत आवरता येत नाही. पण हाच मांजा काही जीवघेणा ठरू लागला आहे. याच पतंगाच्या मांज्याने एक जणाचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना वसईमध्ये घडली आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार, पतंगाच्या मांज्याने एका व्यक्तीचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना वसईत घडली आहे. रविवार असल्याने आपला दहा वर्षाचा मुलगा आणि पत्नीसह बाईकवरुन फिरण्यासाठी जात असताना, एका व्यक्तीच्या गळ्यात मांजा अडकला आणि त्याचा गळा चिरला गेला आहे. त्याला 9 टाके पडले आहेत. सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही, मात्र तरीही गळ्याला टाके पडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
वसईच्या समर्थ रामदास नगर येथे राहणारे विक्रम डांगे असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते काल रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी त्यांची पत्नी नितल आणि दहा वर्षाचा मुलगा प्रांशू यांच्यासह बाईकने वसईच्या मधुबन परिसरातून फिरत होते. त्याचवेळी संध्याकाळी 5.30 च्या दरम्यान मधुबनच्या एका मोकळ्या मैदानात सुरक्षा स्मार्ट सिटी मार्फत पंतग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.
विक्रम डांगे हे कुटुंबासह बाईकवरून जात असतानाच एका पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्याभोवती आवळला गेला आणि त्यांना गळ्यावर चिर पडली. चिर एवढी खोल होती की, त्यामधून बराच रक्तस्त्राव झालं, त्यांच्या गळ्याला 9 टाके पडले आहेत. पत्नीने लागलीच मांजा काढल्याने तसेच विक्रम यांचा बाईकचा स्पीड कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली.
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा चिनी मांजा वापरू नये : ठाणे महापालिका
पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा प्लास्टिक किंवा सिंथेटिक पदार्थापासून तयार केलेला चिनी मांजा किंवा चिनी दोरा किंवा नायलॉन किंवा प्लास्टिक कृत्रिम मांजा हा माणसांसाठी तसेच पक्ष्यांना घातक ठरू शकतो. त्याची अनेक उदाहरण आहेत. त्यामुळे या मांजाच्या वापरावर ठाणे महापालिका क्षेत्रात प्रतिबंध करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात त्याअनुषंगाने सर्व प्रभाग समिती क्षेत्रात एकूण 450 आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून त्यांच्याकडे चिनी मांजा आढळला नाही.