पिंपरी: भोसरीमध्ये एमआयडीसी परिसरातील ऋषी पॉली बॉण्ड या प्लास्टिक मोल्डिंग करणाऱ्या कंपनीला रविवारी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आग एवढी भीषण होती की या आगीत प्लास्टिक कंपनी जळून खाक झाली आहे. रविवारी कंपनीला सुटी असल्यामुळे या आगीत कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी झालेली नाही. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम अग्निशामक दलाचे कर्मचारी करत होते.
रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास ऋषी पॉली बॉण्ड या कंपनीतील प्लास्टिक साहित्याला अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच काही वेळात अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले होते. या कंपनीत प्लास्टिकचे साहित्य मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. अग्निशामक दलाच्या सर्व केंद्रांसह पीएमआरडीए व खासगी कंपन्यांच्या एकूण १५ ते २० गाड्या घटनास्थळी तत्काळ दाखल झाल्या.
कंपनीच्या सुटीचा दिवस असल्यामुळे कंपनीमध्ये एकही कामगार नव्हता. सुदैवाने यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. रात्री उशिरापर्यंत अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.