सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्याला आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला जमत नाही. परिणामी, मधुमेह, रक्तदाब यांसारखी समस्या जाणवू शकते. पण, याची थोडी जरी लक्षणं दिसली की तातडीने उपचार करून घेणे गरजेचे असते. त्याने पुढील धोका टाळता येऊ शकतो.
मधुमेह ही समस्या गंभीर वाटत असली तरी यावर वेळीच उपचार केल्याने परिस्थिती नियंत्रणात आणता येऊ शकते. जेव्हा शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढते, तेव्हा मूत्रपिंड अधिक पाण्याची मागणी करतात, ज्यामुळे एखाद्याला वारंवार तहान लागते. हे एक मधुमेहाचे लक्षण असू शकते. जर तुमचे वजन अचानक कमी होऊ लागले तर ते मधुमेहाचे लक्षण असू शकते, कारण मधुमेहामध्ये शरीराला पुरेसे इन्सुलिन न मिळाल्यास ग्लुकोज साठवण्यात त्रास होऊ लागतो, अशा स्थितीत शरीराला आपले वजन राखण्यासाठी ऊर्जा मिळत नाही.
डायबेटिक न्यूरोपॅथीमुळे वेदना, सुन्नपणा, जळजळ, मुंग्या येणे, हात आणि पायांमध्ये पेटके येतात. ही लक्षणे अनेकदा पायांपासून सुरू होतात आणि वरच्या अंगांकडे जातात. तसेच जास्त तहान लागल्याने शरीरात वारंवार लघवी होण्याची लक्षणे दिसतात, हे विशेषतः रात्रीच्या वेळी होते. ही लक्षणे मधुमेहाची असू शकतात. शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने शरीरातील रक्ताभिसरण मंदावते, त्यामुळे जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. अशाप्रकारची लक्षणे तुम्हाला शरीरात दिसल्यास उपचार करून घेण्याची गरज भासते.