मुंबई : क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अखेर आगामी इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामाची तारीख ठरली आहे. इंडियन प्रीमियर लीगचा आगामी हंगाम २३ मार्चपासून सुरू होणार असल्याची घोषणा राजीव शुक्ला यांनी केली. रविवारी मुंबईमध्ये बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेनंतर शुक्ला यांनी ही घोषणा केली.
तसेच या बैठकीत देवजित सैकिया आणि प्रभतेज सिंग भाटिया यांची अनुक्रमे BCCI चे नवे सचिव आणि कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. जय शहा आणि आशिष शेलार यांच्या रिक्त झालेल्या पदांसाठी सैकिया व भाटिया हे दोघेही बिनविरोध निवडून आले आहेत.
आयपीएलच्या १८ व्या हंगामात दोन दिवसांचा मेगा लिलाव आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये ऋषभ पंत हा आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला . त्याला लखनौ सुपर जायंट्सने २७ कोटी रुपयांची बोली लावून आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले होते. मागच्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व करणारा श्रेयस अय्यर आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्सकडून खेळताना दिसेल आणि त्याच्यासाठी फ्रँचायझीने २६.७५ कोटी रुपये मोजली आहे. तो आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.