शिरूर : मध्य रात्रीची वेळ असताना मुंबईच्या अपरिचित रस्त्यावर शिरूर तालुक्यातल्या मुली पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी दाखल झाल्या. इतक्या रात्री नेमक्के कुठे जायचं या प्रश्नाने सर्वाना व्यथित केलं होतं. तेव्हाच या मुलींसाठी आशेचा एक किरण बनून आले ते म्हणजे पुणे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद. शिरूर तालुक्यातील मुलींसाठी प्रदीप कंद यांनी राहण्याची सोय तर केलीच परंतु, त्यांच्या सुरक्षेचीही काळजी घेतली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील दहा ते बारा मुली या मुंबई शहरात पोलीस भरतीसाठी शुक्रवार दि. १० रोजी रवाना झाल्या होत्या. मुंबई शहरात रात्री उशिरा तेथे पोहोचल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांनी मुक्कामासाठी विचारणा केली, मात्र त्यांच्या पदरी निराशा आली. त्यांना जादा दराचे भाडे परवडणारे नव्हते, तर काही ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न देखील आ वासून पुढे उभा होता.
ग्रामीण भागातील मुलींना मुंबईत राहणे कठीण आहे. आता नेमकं करायचं काय? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. यावेळी ही बाब शिरूर तालुक्यातील युवकांना माहिती पडली. त्यांनी तत्काळ वडगाव रासाईचे सरपंच सचिन शेलार यांना सांगितली. यावेळी सरपंच शेलार यांनी तत्काळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांना याबाबत अवगत केले. प्रदीप कंद यांनी रात्रीच्या अकरा वाजता क्षणाचाही विलंब न करता त्यांचे स्वीय सहाय्यक सुशांत लिमये यांना ज्या ठिकाणी मुली आहेत, त्या ठिकाणी मदतीसाठी पाठवले.
यावेळी लिमये यांनी मुलींची भेट घेऊन त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली, तसेच मुलींना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन सुद्धा दिले. शिरूर तालुक्यातील सर्व मुली या सर्वसामान्य कुटुंबातील व गरीब घरातील असल्याने मुंबईसारख्या मोठ्या शहरात अचानक ओढवलेल्या रात्रीच्या या प्रसंगाने घाबरून गेल्या होत्या.परंतु, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद हे एखाद्या देवदूतासारखे धावून आले आणि शिरूर तालुक्यातील सर्व मुलींचा राहण्याचा प्रश्न मार्गी लावला.
उपस्थित मुलींनी केलेल्या मदतीबद्दल कंद यांचे आभार मानले. या मुलींना मदतीसाठी वडगाव रासाईचे सरपंच सचिन शेलार, इनामगावचे मयूर घाडगे, पिंपळसूटीचे विक्रम लगड, सुशांत लिमये यांचे मोलाचे सहकार्य लाभले.