पुणे : विवाह नोंदणी संकेतस्थळावरुन झालेल्य ओळखीतून एका उच्चशिक्षित महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीने मी उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे सांगून महिलेची ३८ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध बलात्कार, आणि फसवणूक केल्याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका ३७ वर्षीय महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध फिर्याद दिली आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, एका व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात महिलेने विवाह नोंदणी संकेतस्थळावर आपली नोंदणी केली होती.
या संकेतस्थळावरून आरोपीने महिलेशी संपर्क साधून तुमच्याशी विवाह करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आरोपीने महिलेची भेट घेतली. उच्चपदस्थ शासकीय अधिकारी असल्याची बढाई त्याने महिलेकडे केली होती. त्यानंतर महिलेला आमिष लग्नाचे दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
जमीन खरेदीत गुंतवणूक करायची आहे असे सांगून त्याने पीडित महिलेकडून ३८ लाख रुपये घेतले. त्यानंतर महिलेने त्याच्याकडे लग्नाबाबत विचारले असता त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना सुरवसे करत आहेत.