बीड: जिल्ह्यातील मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. आता सरपंच देशमुख हत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ज्यावेळी संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांना मारहाण केली जात होती, त्यावेळी एका आरोपीनं घटनास्थळावरून एक व्हिडीओ कॉल केला होता. व्हिडीओ कॉलवर एकूण सहा लोक होते, जे संतोष देशमुख यांची हत्या लाईव्ह बघत होते, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या हत्या प्रकरणातील आरोपी प्रतिक घुले याने हा व्हिडीओ कॉल केला होता.
पण आरोपी प्रतिक घुले याने हा व्हिडीओ कॉल कोणत्याही व्यक्तीला केला नव्हता, तर त्याने हा व्हिडीओ कॉल व्हॉट्सअॅपवरील ‘मोकारपंती’ नावाच्या ग्रुपवर केला होता. या ग्रुपमधील सहाजण या व्हिडीओ कॉलवर लाईव्ह पाहत होते. या सहाजणांसमोर संतोष देशमुख यांना बेदम मारहाण केली जात होती, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
विशेष म्हणजे व्हिडीओ कॉलवर असणारे सर्व सहाजण 17 ते 19 या वयोगटातील होते. आता हे सहाजण कोण होते आणि संतोष देशमुख यांना मारहाण होताना, या ग्रुपवर व्हिडीओ कॉल करण्याचं नेमकं कारण काय होतं, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.