पुणे: वंदे भारत एक्सप्रेसनंतर विना वातानुकुलित अमृत भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली असून प्रवाश्यांचा या एक्स्प्रेसलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. वंदे भारतपेक्षा तिकीट दर कमी असल्यामुळे आता पुण्यातून उत्तर भारतामधील शहरांसाठी ४ अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे. पुण्यातून दानापूर, छप्रा, मुझ्झपरपुर आणि पुरी या ४ मार्गावर अमृत वंदे भारत सुरु करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार सुरू आहे. त्यापैकी पुण्यातून दानापूर आणि छप्रा आणि हडपसर येथून मुझ्झपरपुर आणि पुरी या दोन ट्रेन सोडल्या जाणार आहेत या ट्रेन साप्ताहिक असण्याची शक्यता आहे. या ट्रेन सुरू झाल्यास उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार असून तिकीट दर देखील माफक असणार आहेत.
पुणे शहर कोणत्या शहरांना जोडले जाणार
पुणे शहर आणखी ४ नव्या शहरांना जोडले जाणार आहे. पुण्यातून अमृत भारत एक्सप्रेसने ४ शहरांना जोडले जाणार असून त्याचे तिकीट देखील कमी असणार आहे. अमृत भारत एक्सप्रेस सुरु झाल्यावर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्यानंतर त्या प्रवाशांच्या पसंतीला उतरल्या आहेत.
अमृत भारत एक्स्प्रेसला प्रवाशांची पसंती
मात्र, त्याचे तिकीट दर जास्त असल्यामुळे सर्वसामान्य प्रवासी वंदे भारतमधून प्रवास करणे टाळतात. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने वंदे भारतसारखीच दिसणारी अमृत भारत एक्सप्रेस नावाने विना वातानूकुलित आणि कमी तिकीट दर असलेली स्लिपर रेल्वे जुलै २०२३ मध्ये सुरू केली आहे. कमी खर्चात आणि कमी वेळेत प्रवास होत असल्यामुळे सध्या अमृत भारत एक्स्प्रेसला प्रवाशांची पसंती मिळत आहे.
अमृत भारत एक्सप्रेसचा वेग देखील चांगला आहे. त्यामुळे या एक्सप्रेसचे जाळे वाढविण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे. त्यामधूनच पुणे रेल्वे स्टेशन येथून दोन आणि हडपसर रेल्वे स्थानकावरून दोन अशा ४ अमृत भारत एक्स्प्रेस चालविण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे. त्याबाबतची सर्व माहिती रेल्वे बोर्डाकडून घेण्यात आली आहे. लकरच आता ही अमृत भारत एक्सप्रेस पुणेकरांच्या सेवेमध्ये येणार आहे.