पुणे : पुण्यातील सय्यदनगर, हडपसर परिसरातील चिंतामणीनगर येथे पोलीसांनी छापा टाकत ८३ हजार रूपयांचा अफिम बोंड्यांचा चुरा (पॉपीस्ट्रा) जप्त केला आहे. या कारवाईत एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुमेरलाल गिरीधरलाल चौधरी (वय-३०, रा. चिंतामणीनगर, हडपसर; मूळ रा. जोधपूर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीकडून अॅक्टीवा दुचाकीवर अफिमचा चुरा विक्रीसाठी नेला जाणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार प्रमोद कोकणे व राहुल शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी तत्काळ सापळा रचून कारवाई करण्याचे आदेश दिले. युनिट दोनच्या अधिकारी व अमंलदारांनी काळेपडळ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त कारवाई करून सुमेरलाल चौधरी याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून ६१५ ग्रॅम अफिम बोंड्यांचा चुरा, अॅक्टीवा दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण ८३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत लटपटे करत आहेत.