पुणे : कोंढणपूर भागातील आर्वी येथे पीएमपी बस चालकाने गायी चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेत तीन गायी दगावलया आहेत, तर अनेक गायी जखमी झाल्या होत्या. ही घटना शुक्रवारी घडली होती. याप्रकरणी बसचालकाला शनिवारी पीएमपी प्रशासनाने निलंबित केले आहे. तसेच, त्याची चौकशी सुरू असून, चौकशीअंती चालकावर आणखी कडक कारवाई होईल, तसेच गायींच्या मालकाला नुकसानभरपाई देण्यात येईल, असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
कोंढणपूर भागातील आर्वी गाव परिसरात पीएमपी बसने शुक्रवारी १४ गायींना धडक दिली. या घटनेत काही गायींचा मृत्यू झाला, तर काही गायी गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच, या पीएमपी बसच्या चालकाला तत्काळ निलंबित करण्यात आले असून गायींच्या मालकाला तातडीची पन्नास हजार रुपयांची मदत शनिवारी (दि. ११) पीएमपीकडून देण्यात आली आहे. चालकाचा जबाब घेण्यात आला असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या घटनेबाबत चालकाची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पीएमपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच, गायींच्या मालकाचीही भेट घेतली. या वेळी सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांच्यासह पीएमपीचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे, अपघात विभागाचे अधिकारी, कात्रज डेपो मॅनेजर उपस्थित होते.
याबाबत बोलताना पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे म्हणाले कि, अपघातप्रकरणी आम्ही चालकाला तत्काळ निलंबित केले असून, त्याची चौकशी सुरू आहे. तसेच, गायींच्या मालकाला तातडीची मदत म्हणून ५० हजार रुपये मदत देण्यात आली आहे. आगामी चौकशीअंती मालकाला आणखी मदत केली जाणार असल्याचे आश्वासन दिले.