आळंदी : आळंदी-पुणे रस्त्यावरील देहू फाटा परिसरात एक वयोवृद्ध महिला रस्ता ओलांडताना डंपरखाली चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (दि. ११) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. विठाबाई बबन साळुंखे (वय ७२ रा. काळेवाडी, चऱ्होली बु, ता. हवेली, जि. पुणे) असे अपघातात ठार झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर डंपरचालक डंपर जागेवर सोडून पळून गेल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
देहू फाटा परिसरात अरुंद रस्ते आणि बीज वितरणचे रस्त्यात असलेले खांब यामुळे वाहतुकीला ठरत असलेला अडथळा एका वृद्ध महिलेच्या जिवावर बेतला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी रस्ता रोखून धरत रस्त्यावरील अतिक्रमण तसेच येथील घरांचा विषय तातडीने मार्गी लावण्याची मागणी लावून धरली. आम्हाला हक्काची घरे द्या, रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणारे महावितरणचे खांब तातडीने काढा यांसह इतर काही मागण्या स्थानिक नागरिकांनी केल्या.
याबाबत मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना फोनवरून संपर्क साधत नागरिकांनी आपल्या मागण्या मांडल्या. याबाबत सोमवारी आळंदी टाउन हॉल येथे स्थानिक नागरिकांची बैठक घेऊ असे केंद्रे यांनी सांगितले. प्रशासनाच्या सहकार्याच्या भूमिकेनंतर स्थानिक नागरिकांनी आपली आक्रमक भूमिका मागे घेत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. दरम्यान, दिघी पोलिस ठाणे, दिघी वाहतूक विभाग यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या अपघातामुळे आळंदी शहरात पोलिस ठाण्यापासून ते देह फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. देहू फाटा गजानन महाराज मठापर्यंत देखील वाहनांची मोठी गर्दी झाली होती.