पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या वाकड पोलिसांनी महागड्या कार चोरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ६० लाख रुपयांच्या चार गाड्या, विविध बनावट चाव्या आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली अत्याधुनिक उपकरणे जप्त केली आहेत. अल्ताफ कासम अत्तार (वय-४०, रा. देहूरोड), जुबेर कयामुद्दीन कुरेशी (वय-३४, रा. उत्तर प्रदेश), मुसाहिद अलियास खान (वय-३१, रा. हरियाणा) आणि नानीशार कमर अली (वय-३८, रा. मध्य प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांपासून महागड्या गाड्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. दरम्यान, २ जानेवारी रोजी वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून हुंडाई क्रेटा कार चोरी झाल्याची घटना घडली होती. या घटनेच्या तपासासाठी वरिष्ठ निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने तपासाला सुरुवात केली.
जवळपास ७०-८० सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचा माग काढण्यात आला. ६ जानेवारी रोजी थेरगाव परिसरातून तीन आरोपीना अटक करण्यात आली. चौकशीत आरोपींनी वाकडसह इतर ठिकाणी गाड्या चोरीची कबुली दिली. आरोपींकडून ५४ लाख ४३ हजार ३१० रुपयांच्या तीन हुंडाई क्रेटा गाड्या, एक किया सेल्टॉस गाडी, ४० बनावट चाव्या, ओव्हीडी स्कॅनर, बनावट नंबर प्लेट्स, स्पेअर पार्ट्स आणि सात मोबाइल फोन जप्त केले आहेत. तसेच या चारही आरोपीकडून पोलिसांनी चार चाकी वाहन चोरीचे एकूण 9 गुन्हे उघडकीस आले आहेत. यात पिंपरी चिंचवड आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील चार चाकी वाहन चोरीच्या गुन्ह्याचाही सहभाग असल्याची माहिती परिमंडळ 2 चे पोलिस उप आयुक्त विशाल गायकवाड यांनी दिली आहे.
आरोपी मुसाहिद खान हुंडाई गाड्यांचा तज्ञ
ही टोळी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कार चोरी करत होती. स्थानिक आरोपी अल्ताफ अत्तार हा शहरातील महागड्या गाड्या निवडायचा. गाड्या चोरी केल्यानंतर टोलनाके टाळून त्या लोणावळ्यात पोहोचवायच्या. चोरीच्या वेळी फोडलेली काच तत्काळ बदलण्यासाठी नवी काच आधीच तयार ठेवत असे. आरोपी मुसाहिद अलियास खान हा हुंडाई गाड्यांचा तज्ञ असून, बनावट चाव्या तयार करण्यात तो पटाईत आहे. ओव्हीडी स्कॅनर डिव्हाइस वापरून गाड्यांच्या चाव्या मॅच करत तो गाड्या सुरू करत असे. आरोपी जुबेर कुरेशी हा गाड्यांचे स्पेअर पार्ट्स काढून भारतभर विक्री करत असल्याचे तपासात समोर आले.