भिगवण : तक्रारवाडी येथील अतिक्रमण रोखू पाहणाऱ्या महिला सरपंचांना अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवारी (दि. ८) तक्रारवाडी येथे घडली आहे. सरपंच वाघ यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अनिल शामराव वाघ, गौरव अनिल वाघ व अशोक शामराव वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, आपल्या जिवाला व कुटुंबाला धोका असून, तक्रारवाडीत देखील मस्साजोग घडण्याची भीती सरपंच मनीषा प्रशांत वाघ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे, तर त्यांचे पती प्रशांत वाघ यांनी या घटनेमागे असलेल्या ‘मास्टरमाइंड’चा शोध घ्यावा, असे म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी महिला सरपंच मनीषा वाघ या नेहमीप्रमाणे ग्रामपंचायतीकडे येत असताना त्यांना ग्रामपंचायत मिळकत नंबर १४०१ मध्ये अतिक्रमण करून एक शेड टाकलेले व एक लोखंडी शेड टाकत असल्याचे निदर्शनास आले. यावरून त्यांनी ग्रामसेवक शोभा जाधव यांना घेऊन चौकशी सुरू केली असता काही ग्रामस्थ जमा झाले. त्यातील अनिल वाघ याने हे शेड माझे असून, इथे शेड बांधणारच आहे, असे सांगताच आपण त्यांना ही ग्रामपंचायतीची सरकारी जागा आहे, कारवाई होईल असे सांगितले.
त्यावर संबंधिताने आपणास अश्लील शिवीगाळ केली, त्यावेळी उपस्थित लोकांनी त्याला बाजूला केले. त्यानंतर भिगवण येथे आंबेडकर चौकात असलेल्या आपल्या पतीच्या दुकानाकडे गौरव वाघ व अशोक वाघ यांनी अतिक्रमण काढण्याच्या रागातून पतीला शिवीगाळ करून कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली असे फिर्यादीत महटले आहे.
याबाबत भिगवणचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांनी सांगितले की, संबधित घटनेत संशयित आरोपींविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, विनयभंग, शिवीगाळ आदी कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत पुढे कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.