पठाणमथिट्टा : प्रशिक्षकाने ५ वर्षांहून अधिक काळ बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दलित किशोरवयीन खेळाडू तरुणीने हा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तब्बल १५ जणांना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ वर्षांच्या या तरुणीवर ती अल्पवयीन असताना विविध ठिकाणी बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आणखी नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात आतापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ६० हून अधिक लोक सहभागी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पठाणमथिट्टा जिल्ह्यातील दोन पोलिस ठाण्यांमध्ये पाच एफआयआर नोंदवल्यानंतर शुक्रवारी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
मुलीचे प्रशिक्षक, सहकारी खेळाडू आणि वर्गमित्रांसह इतर व्यक्तींनी लैंगिक शोषण केल्याचे पुरावे त्यांना मिळाले आहेत. मुलीच्या जबाबानुसार, तिने संशयितांशी संवाद साधण्यासाठी तिच्या वडिलांचा मोबाईल फोन वापरला होता आणि तिच्याकडे असलेल्या डायरीतील फोन तपशील आणि माहितीची पडताळणी करून ४० जणांची ओळख पटवण्यात आली आहे. ही तरुणी अल्पवयीन असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरू झाले. त्यामुळे आरोपीविरुद्ध पोक्सो आणि अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यानुसार गुन्हा दाखल होईल.