पुणे : नवीन वर्षाच्या सुरुवातीला नऊ अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेलेला किमान तापमानाचा पारा पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. पुणे शहरात ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली असून शनिवारी (दि. ११) किमान तापमान १४.३ अंश सेल्सिअस होते. तर, शहरात धुकेही पसरले होते.
दरम्यान, पुढील सहा दिवस आकाश निरभ्र राहून दुपारनंतर हवामान ढगाळ असणार आहे. तसेच सकाळी विरळ धुके राहणार असून येत्या तीन ते चार दिवसांत किमान तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. मागील दोन दिवस ढगाळ हवामानामुळे शहरातील किमान तापमानात चढ-उतार होत आहे.
पुणे शहरात सकाळी गारठा जाणवत होता. दुपारी कडक ऊन, तर सायंकाळी चार वाजल्यानंतर आकाश ढगाळ होते. त्यामुळे पुणेकरांना ऊन-सावलीचा खेळ अनुभवायला मिळाला. गेल्या आठ दिवसांत शहरात हुडहुडी भरणारी थंडी पडली होती. किमान तापमान ९ ते १३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. आता किमान तापमानात पाच ते सहा अंश सेल्सिअस वाढ होणार असल्याने थंडीचा कडाका ओसरणार असल्याचा अंदाज आहे.
उपनगरातील तापमानात वाढ
या आठवड्यात १४, दोन दिवसांपूर्वी किमान १० अंशांवर आले होते. मात्र, राज्यभर असलेल्या ढगाळ हवामानामुळे शहरातील तापमानात पुन्हा वाढ होऊन ते १४ अंशांच्या पुढे गेले आहे. तसेच उपनगरातील तापमानात वाढ झाली आहे. एनडीए १३.८ अंश सेल्सिअस तर पाषाण १४.३, कोरेगाव पार्क १७.९ तर मगरपट्टा येथे १९ अंश सेल्सिअस तापमान होते. शहरात कमाल तापमान २९.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. तर, जिल्ह्यात सर्वांत कमी किमान तापमान हवेली येथे १२.५ अंश होते.
संपूर्ण राज्यात हवामान कोरडे
दरम्यान, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवस किमान तापमानात फारसा फरक होण्याची शक्यता नाही. संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. विदर्भात किमान तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढण्याचा अंदाज आहे.