वैवाहिक जीवन सुखी असावं असं सर्वच पुरुष अथवा महिलांना वाटत असतं. त्यानुसार, प्रयत्नही केले जातात. पती असो वा पत्नी वैवाहिक जीवनात काही गोष्टींची काळजी घेतल्यास अडचणी येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांना वेळ द्या. कारण, यातून अनेक अडचणी, समस्या सोडवल्या जाऊ शकतात. परिणामी, वैवाहिक जीवन सुखी राहू शकतं.
तुम्ही तुमच्या सोशल मीडिया फीड किंवा तुमच्या न्यूज ॲपपासून दूर राहा. त्याऐवजी तुमच्या जोडीदाराकडे लक्ष द्या. त्याच्याशी किंवा तिच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधा. दिवसातून किमान 5 मिनिटे एकमेकांशी प्रेमाने बोला. अडचण, समस्या काही असेल तर ती मनमोकळेपणाने मांडा. दिवसातून एकदा तरी तुम्ही एकमेकांशी शांतपणे बोलले पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या काही गोष्टी पटत नसतील तर त्या उघडपणे न बोलता एकट्याने बोला. अशाने सुधारणेला वाव मिळू शकतो.
पती-पत्नी दोघेही कुठेतरी वीकेंडच्या सुट्टीवर एकत्र जाऊ शकता, पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवू शकता, पिकनिकला जाऊ शकता किंवा चित्रपट पाहू शकता. असे तुम्ही महिन्यातून दोनदा केले तरी तुमचे नाते आणखी घट्ट होऊ शकते. बोलण्याने समस्या सोडवण्यासाठी वाव मिळू शकतो. त्यामुळे शक्य तेवढं एकमेकांशी बोला.