अमरावती: पती-पत्नीसह दोन मुलांवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला. ही धक्कादायक घटना गुरुवार, ९ जानेवारी रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी संबंधित महिलेच्या तक्रारीवरून जात पंचायतीतील दहा जणांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ५, ७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दीपक पांडुरंग पवार, सुधाकर पवार, देवेंद्र सूर्यवंशी, धनराज पवार, शैलेश पवार, मनीष सूर्यवंशी (सर्व रा. विलासनगर, अमरावती), किशोर पवार, ज्ञानेश्वर पवार, खेमराज सोळंके (तिघेही रा. जुनी वस्ती, बडनेरा) व देवा पवार (रा. तिवसा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तक्रारदार महिलेचे लग्न रीतीरिवाजाप्रमाणे झाले असून त्यांना दोन मुलेदेखील आहेत. महिलेला दुसरा मुलगा झाला, तेव्हा त्या माहेरी आईकडे होत्या. त्यावेळी अन्य एक महिला त्यांच्याकडे आली. मी तुझ्या नवऱ्यापासून गर्भवती आहे. मला तुझ्या नवऱ्यासोबत लग्न करायचे आहे. आता तर तुझ्या नवऱ्याला मला घरात घ्यावेच लागेल, असे ती महिला त्यांना म्हणाली. त्या महिलेने तक्रारदार महिलेच्या पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. याबाबत तक्रारदार महिलेने आपल्या पतीला विचारपूस केली. त्यावर त्यांनी आपले लग्नापूर्वी त्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते, त्यावेळी तिला लग्नाबाबत विचारले होते. मात्र, तिने लग्न केले नाही, असे त्यांनी त्यांना सांगितले.
दरम्यान, त्या महिलेने विलासनगर येथील संबंधित जात पंचायत कार्यालयात तक्रारदार महिलेच्या पतीविरुद्ध तक्रार केली. त्यावर पंचायतने तक्रारदार महिला व त्यांच्या पतीला बोलावून घेतले. त्या महिलेसोबत लग्न कर, असा आदेश यावेळी तक्रारदार महिलेच्या पतीला देण्यात आला, त्यावर त्यांनी नकार दिला. त्यामुळे
जात पंचायतमध्ये असलेल्या संबंधित दहा जणांनी तक्रारदार महिला, त्यांचे पती व त्यांच्या दोन मुलांना समाजामधून बाहेर काढल्याचा निर्णय दिला.
समाजातील कुणी व्यक्ती तक्रारदार महिला किंवा त्यांच्या कुटुंबाशी बोलल्याचे आढळल्यास त्यांनासुद्धा समाजाबाहेर काढून टाकले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. तेव्हापासून आपल्यासह पती व दोन मुलांवर समाजासह नातेवाईकांनीसुद्धा बहिष्कार टाकल्याची तक्रार महिलेने गाडगेनगर पोलीस ठाण्यात दाखल केली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील पोलीस करत आहेत.