पुणे : शहरातील वैकुंठ स्मशानभूमीत कुत्र्यांकडून कोणत्याही मृतदेहाचा कोणताही भाग पळविला गेला नाही. मात्र, तेथील व्यवस्थेवरील नियंत्रण आणि स्वच्छता याबद्दल संबंधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली आहे.
वैकुंठ स्मशानभूमीत अर्धवट जळालेल्या मानवी मृतदेहाचे तुकडे भटक्या कुत्र्यांनी पळवल्याचे व्हिडीओ बुधवारी समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. स्मशानभूमीत मानवी मृतदेह जाळण्याची जबाबदारी असलेल्यांच्या बेजबाबदार कारभारामुळे मृतदेह पूर्ण जळत नसल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. मानवी मृतदेहाचा असा अपमान होणे हे निंदनीय असल्याचेही मत व्यक्त करत या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
समाज माध्यमांवर यासंदर्भातील व्हिडिओ समोर आल्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. या पाहणीत कुत्र्यांनी पळविलेले तुकडे मानवी देहाचा तुकडा नसल्याचा दावा प्रशासनाने केला होता. दरम्यान, या घटनेनंतर अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी वैकुंठ स्मशानभूमीला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.
याबाबत बोलताना ते म्हणाले, कुत्र्यांनी पळविलेले ते तुकडे मृतदेहाचे नव्हते. मात्र, या ठिकाणी स्वच्छता आणि अंत्यविधी संदर्भात नियुक्त केलेल्या ठेकेदाराला यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच येथे तातडीने सर्वंकष स्वच्छता करणे, वृक्षांची छाटणी करणे, परिसरात मोकाट कुत्र्यांना पकडणे, स्मशानभूमीत मोकाट कुत्र्यांना काही प्राणिप्रेमी खाद्यपदार्थ आणून देत असतील, तर त्याला प्रतिबंध करण्याचे आदेश दिले असल्याचे पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.