शिरूर: येथील अप्पा पवार ( रांजणगाव गणपती-भांबर्डे (ता. शिरुर) यांनी सुमारे 27 तासात सायकलवर अष्टविनायकाचे दर्शन पूर्ण करण्याचा यशस्वी उपक्रम पूर्ण केला आहे.
पवार यांनी सर्वप्रथम सिद्धटेक, जि.अहिल्यानगर येथील गणपतीच्या मंदिरात सकाळी साडेअकरा वाजता पोहचून दर्शन घेतले.त्यानंतर त्यांनी मोरगावच्या गणपतीच्या दिशेने प्रवास करुन दुपारी दीड वाजता मोरगावच्या गणपतीचे दर्शन घेतले, त्यानंतर जेजुरी मार्गे ते दुपारी पावणे चार वाजता थेऊरच्या गणपतीचे दर्शन घेऊन त्यांनी महाडच्या गणपतीच्या प्रवासास सुरवात केली.पुणे शहरातून बाहेर पडल्यावर जुन्या मुंबई पुणे महामार्गाने महाड येथील गणपतीचे रात्री दहा वाजता दर्शन घेतले.तिथे मुक्काम करून सकाळी साडेआठ वाजता पालीच्या गणपतीचे दर्शन घेतले.
त्यानंतर पुढे लेण्याद्री व ओझर गणपतीच्या दिशेने प्रवासास सुरुवात केली. पाली गणपती वरून प्रवास करत करत महाडच्या गणपतीच्या दिशेने महाड येथे येऊन परत जुना मुंबई-पुणे मार्गे खोपोलीचा घाट हा अवघ्या 45 मिनिटात चढाई करून लोणावळा मार्गे पुढील प्रवासास पुण्याला निघाले.खंडाळा लोणावळा कामशेत व तळेगाव दाभाडे येथून सायकलने चाकणच्या प्रवासाला सुरुवात केली.
तळेगाव दाभाडे ते चाकण हे अंतर अवघ्या एक तासामध्ये पूर्ण केले.तसेच चाकण ते नारायणगाव लेण्याद्री व ओझर हे अंतर दोन तास 50 मिनिटांमध्ये पूर्ण केले. प्रथम लेण्याद्री गणपतीचे दर्शन घेवून पुढे ओझरच्या गणपतीचेही दर्शनही घेतले.त्यानंतर सर्वात शेवटी रात्री साडे नऊ वाजता अष्टविनायक रांजणगावच्या महागणपतीचे दर्शन घेतले आणि सायकलवरील अष्टविनायक दर्शन मोहिम पुर्ण केली.
या मोहिमेसाठी उद्योजक नितीन दौंडकर यांनी आठ हजार रुपये किंमतीची सायकल भेट दिल्याचे पवार यांनी बोलताना सांगितले. दरम्यान, पवार यांनी यापूर्वी कळसूबाई शिखर सह राज्यातील अनेक गड किल्यांची चढाई पुर्ण केली आहे.