पुणे : राज्य सरकारच्या पिंक ई-रिक्षा योजनेंतर्गत महापालिका हद्दीत २ हजार ८०० महिलांना ई-रिक्षा देण्यात येणार आहेत. यासाठी शहरातील महिलांनी महापालिकेकडे अर्ज करावेत, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने पिंक ई-रिक्षा योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत तीन लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना ही रिक्षा घेण्यासाठी कर्ज तसेच अनुदान देण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय आणि महिला बालकल्याण विभाग यांच्यासोबत महापालिकेच्या समन्वयाने ही योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार शासनाकडून ई-रिक्षासाठी नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राष्ट्रीयीकृत बँका तसेच या योजनेंतर्गत मान्यता देण्यात आलेल्या खासगी बँकांकडून ई- रिक्षा किमतीच्या ७० टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
५ वर्षांत करावी लागणार परतफेड
राज्य शासन २० टक्के निधी देणार आहे, तर लाभार्थी महिला, मुली यांना १० टक्के रक्कम भरावी लागणार आहे. या रिक्षासाठी देण्यात येणारे ७० टक्के कर्ज लाभार्थी महिलांना ५ वर्षांत परतफेड करावे लागणार आहे. ही योजना शहरात राबविण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनावर देण्यात आली आहे.
येथे करा अर्ज?
या योजनेंतर्गत २ हजार ८०० रिक्षांसाठीचे अर्ज भरून घेण्याचे उद्दिष्ट महापालिका प्रशासनास देण्यात आले आहे. योजनेचे अर्ज क्षेत्रीय कार्यालयामधील समाज विकास विभागामध्ये कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. भरलेले अर्ज कागदपत्रांसह या ठिकाणीच जमा करावेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
अशा आहेत योजनेच्या अटी
- लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असावे.
- अर्जदार महिलेचे वय २० ते ४० वर्षे आवश्यक.
- लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा जास्त नसावे.
- विधवा, कायद्याने घटस्फोटित महिलांना प्राधान्य.
ही लागतील कागदपत्रे
लाभार्थीना योजनेसाठी अर्ज, आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, कुटुंबप्रमुखाचा तीन लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला, मतदान कार्ड, केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट फोटो, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, महिला स्वतः रिक्षा चालवण्याचे हमीपत्र, महिलेचे बँक कर्ज नसल्याचे हमीपत्र, अटी व शर्ती पालन करण्याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे.