बीड: जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सातत्याने नवेनवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपींवर आज मकोका लावण्यात आला आहे. परंतु, वाल्मिक कराडविरोधात खंडणीचा गुन्हा असल्याने त्याच्यावर मकोका लावण्यात आलेला नाही. दरम्यान, याही पलिकडे जाऊन सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज नवा गौप्यस्फोट केला आहे. सतत धमकी, खंडणी आणि अपहरणाची तक्रार करूनही वाल्मिक कराडवर कारवाई न झाल्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी सुनील केदू शिंदे यांनी केलेली पीसीआरची प्रत समाजमाध्यमांवर शेअर केली आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या, “अतिशय धक्कादायक! या प्रकरणाशी संबंधित पी सी आर वाचून मन खूप अस्वस्थ झाले आहे. प्रचंड राग येतोय सगळ्यांपुढे हे महत्त्वाचे मुद्दे ठेवायचे आहेत”, असं म्हणत त्यांनी सुनील शिंदे यांच्याबाबत घडलेला प्रसंग सांगितला आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या, “शिवाजी थोपटे यांना वाल्मिक कराड यांनी त्यांच्या परळी येथील कार्यालयात बोलावून, अवादा कंपनीचे केज तालुक्यातील सर्व काम बंद करा अन्यथा काम चालू ठेवायचे असेल तर २ करोड रुपये द्या असे सांगितले होते. वेळोवेळी विविध लोकांच्या मोबाईलवरून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या प्रकल्पाचे काम बंद ना ठेवल्यास मारहाणीच्या व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. २८ मे २०२४ रोजी ११ वाजण्याच्या सुमारास याच प्रकरणावरून माझे अपहरण केले होते. याबाबत पोलीस ठाणे केज येथे तक्रार दिली होती. त्यावरून पोलीस ठाणे केज येथे गुन्हा क्रमांक २८५/२०२४ गुन्हा दाखल झाला आहे.” सुनील शिंदे यांच्या तक्रार अर्जात शिवाजी थोपटे यांच्याविषयी ही माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, अंजली दमानिया पुढे म्हणाल्या, “इतक्या वेळ जर जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आणि अपहरण देखील झालं, तर वाल्मिक कराडवर कारवाई का झाली नाही? ही कारवाई वेळेत झाली असती तर आज स्वर्गीय संतोष देशमुख जिवंत असते. ह्या बीड पोलिसांवर आणि गृह खात्यावर आपण विश्वास ठेवून आपण योग्य तपास होईल अशी आशा तरी करू शकतो का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.