नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील कामकाज व आतमधील वातावरणाबाबत सामान्य जनतेमध्ये मोठे कुतुहल असते. त्यामुळे सामान्य जनतेला न्यायालयातील वातावरण पाहता यावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आपले दरवाजे उघडले आहेत. यासाठी निर्धारित करण्यात आलेल्या दिवशी लोकांना आतमध्ये जाऊन न्यायालय व त्याचा परिसर पाहता येणार आहे. यापूर्वी २०१८ साली असा उपक्रम राबवण्यात आला होता, हे विशेष.
न्यायालयाच्या गूढ वातावरणाबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दुसरा आणि चौथा शनिवार आणि सुट्या वगळता कामकाजाच्या प्रत्येक शनिवारी लोकांना सर्वोच्च न्यायालयातील कामकाज कसे चालते हे पाहता येईल. न्यायालयाच्या कॉरिडोरमधून फिरताना लोकांना ही ऐतिहासिक इमारत जळवून बघण्याची संधी मिळणार आहे. न्यायालयातील रजिस्टार महेश पाटणकर यांनी यासंबंधीचे परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार निर्देशित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांसोबत सामान्य लोकांना न्यायालयात फिरवले जाणार आहे. यावेळी अधिकाऱ्यांकडून विविध बाबींची माहिती लोकांना दिली जाईल.
भेटीचा वेळ देखील यात नमूद करण्यात आला आहे. पण या भेटीसाठी ऑनलाइन बुकिंग करणे अनिवार्य असेल. लोकांना न्यायाधीशांसाठीचे नवीन ग्रंथालय देखील पाहण्याची संधी मिळणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे सामान्य लोकांसाठी अशा प्रकारचा पहिला उपक्रम ३ नोव्हेंबर २०१८ रोजी राबवण्यात आला होता. तेव्हापासून लोकांच्या २९६ भेटी झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाची इमारत १९५८ साली उभारण्यात आली होती. या इमारतीची पायाभरणी १९५४ साली देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आली होती.